
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊन भारताने प्रत्युत्तर दिले आहे.

भारताने दहशतवादाविरुद्ध "ऑपरेशन सिंदूर" सुरू केलं आणि पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून, ही कारवाई भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे पूर्ण केली.

भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीने सांगितले की, भारताने 24 क्षेपणास्त्रे डागली आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवलं होतं.

पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यात 80 - 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान सतर्क आहे आणि भारताने हरियाणा आणि पंजाबमधील सर्व हवाई तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

भारतातही 7 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथे जाणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली.

हल्ल्यानंतर जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ येथील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील असं देखील सांगण्यात येत आहे. तर पठाणकोटमधील सर्व शाळा 72 तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.