
बॉलिवूडची प्रसिद्धी आणि अफाट पैसा पाहून अनेकांना वाटते की कलाकारांचे आयुष्य सुंदर असते. मात्र, या चमकदार दुनियेच्या पडद्यामागे अनेकदा एक भयावह अंधार लपलेला असतो. 70 च्या दशकातील सर्वात सुंदर, बोल्ड आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री त्याचे एक उदाहरण आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव परवीन बाबी आहे. इतकी मोठी स्टार असूनही तिच्या मृत्यूनंतर तब्बल तीन दिवसांपर्यंत तिच्या पार्थिवाला कोणीही खांदा दिला नाही ही बाब मन हेलावून टाकणारी आहे.

आत्मविश्वास, सौंदर्य आणि लूकमुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांच्या आवडती बनली होती. परवीन बाबी या ‘टाइम मॅगझीन’च्या कव्हरवर झळकणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या. हा सन्मान आजही इतिहासात नोंदवलेला आहे.

परवीन बाबींच्या मानसिक आजाराचे पहिले साक्षीदार महेश भट्ट होते. 1979 मधील एका संध्याकाळी ते परवीन यांच्या घरी गेले असता त्यांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. तेव्हा परवीन यांच्या हातात चाकू होता. त्या म्हणाल्या की, 'काहीही बोलू नका, या खोलीत रेकॉर्डिंग डिव्हाइस लावले आहे. हे लोक मला मारू पाहत आहेत.'

परवीन यांना पॅरानोईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक आजाराची सुरुवात होती. त्यांना सर्वत्र कटकारस्थाने दिसू लागली. त्यांची मानसिक स्थिती इतकी बिघडली की अमिताभ बच्चन यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप केला.

महेश भट्ट यांनी अनेकदा सांगितले आहे की, त्यांनी परवीन बाबींच्या उपचारासाठी खूप प्रयत्न केले. एका प्रसंगात वाद झाल्यानंतर भट्ट घर सोडून निघाले असता, परवीन त्यांना थांबवण्यासाठी कपड्यांशिवायच मुंबईच्या रस्त्यावर धावत गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले.

त्यानंतर काही वर्षांनी 22 जानेवारी 2005 रोजी जुहू येथील त्यांच्या फ्लॅटबाहेर दोन दिवसांपासून दूधाचे पॅकेट्स आणि वर्तमानपत्रे साचत होती.

दुर्गंधी पसरल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. घर उघडले असता, परवीन बाबींचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. डॉक्टरांच्या मते, त्यांचा मृत्यू किमान तीन दिवसांपूर्वी झाला होता.