अहमदाबादसारखीच भीषण विमान दुर्घटना, टेक-ऑफनंतर लगेच कोसळलं; आगीचा मोठा गोळा
अपघातानंतर स्थानिक खासदार डेव्हिड बर्टन-सॅम्पसन यांनी लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आणि आपत्कालीन सेवांना त्यांचं काम करू देण्याचं आवाहन केलं आहे. साऊथएंड विमानतळ हे ब्रिटिश राजधानी लंडनपासून सुमारे 72 किलोमीटर पूर्वेला आहे.

london southend airport plane crash Image Credit source: Twitter
- रविवारी एसेक्समधील लंडन साऊथएंड विमानतळावर एक विमान कोसळलं. भारतात अहमदाबाद एअरपोर्टवर ज्या प्रकारे एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं, त्याचप्रकारे हे विमानसुद्धा टेक-ऑफनंतर काही क्षणांतच कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर मोठा आगीचा गोळा निर्माण झाला.
- हे विमान Beech B200 Super King Air असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबद्दल अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. त्याचप्रमाणे विमानातील प्रवाशांबाबतही कोणतीच माहिती समोर आली नाही. या घटनेनंतर एसेक्समधील विमानतळाने पुढील सूचना मिळेपर्यंत कामकाज स्थगित केलंय.
- विमानतळाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात विमानतळावर मोठा आगीचा गोळा आणि धुराचे लोट दिसत आहेत. या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
- जे विमान कोसळलं, ते 12 मीटर लांब असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामध्ये 12 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. परंतु अपघाताच्या वेळी विमानात किती प्रवासी होते आणि किती जणांचा मृत्यू झाला, याविषयी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
- एसेक्स पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलंय, त्यांना स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता विमानतळावर एका गंभीर अपघाताची माहिती मिळाली होती. त्यानंततर पोलीस पथक लगेचच घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी आपत्कालीन सेवांसोबत काम करण्यास सुरुवात केली.





