
मुंबई | 11 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. आठवड्याभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात काही नवे चेहरे राजकारणात पाऊल ठेवताना पाहायला मिळतायेत. सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज एका बड्या खेळाडूचा पक्षप्रवेश होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. चंद्रहार पाटील आज दुपारी चार वाजता आपल्या हाती शिवबंधन बांधतील.

पैलवान चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच ते ठाकरे गटात प्रवेश करतील, या चर्चेला बळ मिळालं. चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करतील. त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या आखाड्यातील मोठं नाव आहे. 2007 ला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदेचे ते मानकरी ठरले आहेत. तर 2008 ला सांगली रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेतेपदावरही त्यांनी आपलं नाव कोरलं.

मागच्या काही महिन्यांपासून सांगलीच्या राजकीय वर्तुळात चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढतील, अशी चर्चा होतेय. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. स्थानिकांशी भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे सांगलीतून महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.