पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा गोंधळ संपता संपेना, एन्ट्री पॉईंटवरील एक चूक ठरेल जीवघेणी, नेमकं काय घडतंय?
णे-मुंबई मिसिंग लिंक सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी, लोणावळ्याजवळील सुरुवातीच्या पॉइंटवर दिशादर्शकाच्या अभावामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे.

महाराष्ट्र दिनी (१ मे) लोकार्पण झालेल्या पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग खुला झाल्यापासून एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडी आणि अपघातांबाबत नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण शून्यावर आले आहे.

मात्र, या मार्गाच्या सुरुवातीला आता एक नवा सावळागोंधळ समोर आला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकवर असलेल्या एका तांत्रिक अडचणीमुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

मिसिंग लिंक सुरू होण्यापूर्वी या भागात दररोज १० ते १५ अपघात किंवा वाहतूक कोंडीचे कॉल नियंत्रण कक्षाला प्राप्त होत असत. मात्र, कालपासून मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने नियंत्रण कक्षाला असा एकही कॉल आलेला नाही.

पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

मात्र पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना जिथून मिसिंग लिंक सुरू होतो, त्या तोंडावर वाहन चालकांची मोठी गफलत होत आहे. एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) प्रशासनाने दोन किलोमीटर आधी एक मोठा दिशादर्शक फलक लावला आहे.

पण प्रत्यक्ष वळणावर केवळ एकच दिशादर्शक असल्याने चालकांना नेमके कोणत्या मार्गाने जायचे (लोणावळा की मुंबई मिसिंग लिंक) हे समजत नाही. यामुळे गोंधळ होत आहे.

या गोंधळामुळे अनेक वाहन चालक थेट रस्त्याच्या मध्यभागी अचानक गाडी थांबवत आहेत किंवा वेग कमी करत आहेत. यामुळे मागून येणाऱ्या वेगवान वाहनांची धडक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी अधिक स्पष्ट आणि ठळक दिशादर्शक लावण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे. मात्र या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे.