Photo : नसरापूर बालिका अत्याचाराने नागरिक संतप्त, मुंबई-सातारा हायवे रोखला, पोलिसांकडून धरपकड
पुण्याच्या नसरापूर येथील चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडल्याने. नागरिकांनी आरोपीवर तातडीने कारवाई करुन या बालिकेला न्याया द्यावा या मागणीसाठी मुंबई-सातारा हायवे रोखला. अखेर रात्री उशीरा पोलिसांनी नागरिकांना हुसकावून लावत वाहतूक सुरु केली आहे.

पुणे येथील नसरापूर येथे एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिची दगडाने निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय आरोपी नराधम भीमराव कांबळे याला अटक झाली आहे. या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाने तातडीने खटला चालवून फाशी देण्याची मागणी होत आहे.

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकली तिच्या आजीकडे सुट्टीनिमित्त आली होती. तिला वासरु दाखवतो असे सांगून या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र,त्याला अशाच गुन्ह्यात जामीन झाल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. नागरिकांनी शनिवारी सायंकाळपासून मुंबई- सातारा हायवे रोखून धरला आहे.आंदोलक नागरिक पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

गेली तीन ते चार तासांपासून मुंबई सातारा हायवेवर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनामुळे मुंबई सातारा एक्सप्रेस हायवे वरील वाहतूक गेल्या अनेक तासापासून ठप्प आहे.नागरिकांना हटवण्यासाठी अखेर रात्री पोलिसांनी कारवाई करीत नागरिकांना हुसकावून लावण्यास सुरुवात केली.

नसरापूर प्रकरणातील मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत रास्ता रोखो केल्याने अनेक वाहने खोळंबली होती.त्यामुळे पोलिसांनी अखेर या नागरिकांना हुसकावून लावल्याने अखेर वाहतूक हळूहळू सुरु झाली आहे.