
भारतीय आहारात तुपाला विशेष महत्त्व आहे. तूप हे केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नव्हे, तर आयुर्वेदिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून आरोग्यासाठी वरदान मानले जाते. पण अनेकजण वजन वाढेल या भीतीने तूप खाणे टाळतात.

आहारतज्ज्ञांच्या मते, तुपाचे नियंत्रित सेवन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तूप खाल्ल्याने सरसकट वजन वाढते, हा गैरसमज आहे.

वजन वाढणे हे प्रामुख्याने 'कॅलरी इनटेक' आणि 'कॅलरी बर्न' यांच्या संतुलनावर अवलंबून असते. आहारतज्ज्ञांच्या मते, दररोज १ ते २ लहान चमचे शुद्ध, देशी गाईचे तूप खाणे वजन नियंत्रणासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

तूप खाल्ल्याने थेट वजन वाढत नाही. वजन तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी खाता. तुपात असलेल्या फॅट्समुळे पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते.

तुपात ब्युटेरिक ऍसिड (Butyric Acid) असते, जे पचनास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. पचन चांगले असल्यास मेटाबॉलिझम सुधारते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तूप पूर्णपणे सोडून देऊ नका. तेलाऐवजी किंवा बटरऐवजी मर्यादित प्रमाणात शुद्ध तुपाचा वापर करा. खासकरून देशी गाईचे तूप वापरावे. कारण त्यात 'कॉन्जुगेटेड लिनोलिक ऍसिड' (CLA) सारखे घटक असतात.हे घटक शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यास आणि स्नायूंचे (Muscles) आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात.