Radhika Apte: कधीकाळी 8 हजारांची कमाई, आता राधिका आपटे तब्बल इतक्या कोटींची मालकीण; मुंबईसह लंडनमध्ये आलिशान घर
Radhika Apte: आपल्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे हिने गेल्या काही वर्षांत चांगली संपत्ती कमावली आहे. राधिका एका चित्रपटासाठी किंवा सीरिजसाठी किती मानधन घेते आणि तिची संपत्ती किती आहे, ते जाणून घ्या..

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका आपटे. कोणत्याही ठरावीक चौकटीत न अडकता वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी राधिका ओळखली जाते.
राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी तमिळनाडूतील वेल्लोर इथं झाला. तिचं बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं. फर्ग्युसन कॉलेजमधून तिने अर्थशास्त्र आणि गणिताचं शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि नृत्याची आवड होती. तिने प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतले.
राधिकाने 2005 मध्ये 'वाह! लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात मात्र तिला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. थिएटरमध्ये काम करत असताना तिची कमाई महिन्याला साधारण 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत होती.
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं होतं की, तिने आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी लग्नाची पार्टी खूप एन्जॉय केली होती. पार्टीमध्ये सगळे इतके रमून गेले होते की, लग्नाच्या वेळी एकही फोटो काढला गेला नाही.
राधिका आपटेच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर, एका चित्रपटासाठी किंवा वेब सीरिजसाठी ती जवळपास 4 कोटी रुपयांपर्यंत फी आकारते. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही तिची चांगली कमाई होते. CNBCच्या रिपोर्टनुसार, राधिका आपटे जवळपास 66 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. तर तिचा पती बेनेडिक्ट टेलर याची संपत्ती जवळपास 42 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.