
अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रेड 2' हा चित्रपट गुरुवारी 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

'रेड 2'ने पहिल्याच दिवशी 18.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या आकड्यासह हा चित्रपट 2025 मध्ये सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. याआधी विकी कौशलच्या 'छावा'ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये आणि सलमान खानच्या 'सिकंदर'ने 26 कोटी रुपये कमावले होते.

याआधी अजय देवगणचे 'सिंघम अगेन', 'औरों में कहां दम था', 'मैदान' आणि 'शैतान' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यापैकी 'शैतान'ने बॉक्स ऑफिसवर 148 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर 'सिंघम अगेन'ने 248 कोटी रुपयांची कमाई केली होती.

अजयचे 'औरों में कहां दम था' आणि 'मैदान' हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. त्यापैकी 'औरों में कहां दम था' हा चित्रपट फक्त 11.5 कोटी रुपये कमावू शकला होता. तर 'मैदान'ने 53 कोटी रुपये कमावले होते.

'रेड 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलं आहे. 'रेड' या पहिल्या चित्रपटाने ओपनिंगला 10 कोटींची कमाई केली होती. तर या चित्रपटाची एकूण कमाई 103 कोटी रुपये इतकी होती. पहिल्यापेक्षा हा सीक्वेल आणखी चांगली कामगिरी करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.