
बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला, त्यातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली, परंतु त्यानंतर ते गायबच झाले. असाच एक अभिनेता म्हणजे गिरीश कुमार. बारा वर्षांपूर्वी त्याने 'रमैया वस्तावैया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

गिरीश सध्या अभिनयापासून दूर असून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. मुंबईतील एका जिममधून बाहेर पडताना पापाराझींनी त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये गिरीशचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

'रमैया वस्तावैया' या चित्रपटात गिरीश कुमार आणि श्रुती हासन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटानंतर त्याची चॉकलेट बॉय अशी ओळख झाली होती. पहिल्याच चित्रपटातून तो चर्चेत आला होता. परंतु त्यानंतर तो अभिनय सोडून बिझनेसकडे वळला.

सध्या वाढलेल्या वजनामुळे गिरीशला ओळखणंही कठीण झालं आहे. वांद्र्यातील एका जिममधून बाहेर पडताना पापाराझींनी त्याचा व्हिडीओ शूट केला. यावेळी तो त्यांना वजन कमी करत असल्याचं सांगतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

गिरीश कुमार हा चित्रपट निर्माते एस. तौरानी यांचा मुलगा आहे. एस. तौरानी हे भारतीय सिनेसृष्टीतील मुख्य कंपनी 'टिप्स' इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. अभिनय सोडल्यानंतर गिरीशने त्याच्या कौटुंबिक व्यवसायाकडे लक्ष दिलंय. तो सध्या टिप्स इंडस्ट्रीजचा सीओओ आहे.