दूरदर्शनवरील 37 वर्ष चालणारा शो, घराघरात पहिले गेले 1508 एपिसोड; जगभरात होते चाहते
दूरदर्शनवरील काही सिरियल आणि शो आजही अनेकांच्या सदाबाहार आठवणींचा एक भाग आहेत. रविवारची सकाळ आणि जुन्या हिंदी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम असे समीकरण असलेले कार्यक्रम 80-90 च्या दशकातील प्रेक्षकांसाठी खास होते. त्यापैकी एक 1989 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाने तब्बल 37 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

‘रंगोली’ची सुरुवात 1989 मध्ये दूरदर्शनवर झाली. सुरुवातीला दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर शर्मिला टागोर यांनी ही जबाबदारी सांभाळली आणि दोन्ही अभिनेत्रींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष लोकप्रियता मिळाली. त्या काळात मोठ्या पडद्यावरील कलाकार टेलिव्हिजनवर दिसणे हीच प्रेक्षकांसाठी मोठी उत्सुकतेची बाब होती. त्यामुळे शोची लोकप्रियता आणखी वाढली.
काळानुसार ‘रंगोली’च्या सूत्रसंचालकांमध्ये बदल होत गेले. शर्मिला टागोर यांच्यानंतर मयूरी कांगो कार्यक्रमाचा चेहरा बनल्या, तर इंदर कुमार हे या शोचे एकमेव पुरुष अँकर होते. कार्यक्रमात सुरुवातीला जुन्या हिंदी गाण्यांना आणि शेवटच्या 15 मिनिटांत नव्या गाण्यांना स्थान दिले जात होते.
प्राची शाह, श्वेता तिवारी, सारा खान, स्वरा भास्कर, नीतू चंद्रा, सुरवीन चावला आणि हृषिता भट्ट यांनीही ‘रंगोली’चे सूत्रसंचालन केले. 90 च्या दशकात या कार्यक्रमाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. भारतासोबतच मिडिल ईस्ट आणि अमेरिकेतील भारतीय प्रेक्षकांमध्येही हा शो लोकप्रिय होता. जुन्या गाण्यांसोबत नव्या गाण्यांचीही मेजवानी मिळत असल्याने वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमाशी जोडले गेले. या कार्यक्रमाचे १५०८ एपिसोड प्रदर्शित झाले आणि सगळ्यांना भरभरून प्रेम मिळालं.
1997 मध्ये ‘रंगोली’ आणि ‘चित्रहार’च्या निर्मितीची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपवण्यात आली. ‘रंगोली’चे प्रोडक्शन क्रिएटिव्ह आयच्या धीरज कुमार यांच्याकडे गेले. ‘चित्रहार’ची जबाबदारी प्लस चॅनेलच्या अमित खन्ना यांच्याकडे देण्यात आली. हा शो जवळपास ३७ वर्षांहुन अधिक काळ चालला.
2014 मध्ये रविवार सकाळच्या 8 ते 9 या स्लॉटमध्ये ‘रंगोली’ला चांगली रेटिंग मिळाली. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये अभिनेत्री मधु यांनी कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. आजही ‘रंगोली’शी जोडलेल्या जुन्या गाण्यांच्या आणि रविवारच्या सकाळच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.