
बॉलिवूड इंडस्ट्रीत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची गणना टॉप सुपरस्टार्समध्ये होते. हे कलाकार त्यांच्या एका चित्रपटासाठी तगडं मानधन घेतात. पण इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत अभिनेता कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हा अभिनेता तब्ब्ल 74,000,000,000 चा मालक आहे. इतकंच नव्हे तर या सुपरस्टारच्या पत्नीचा स्वत:चा व्यवसाय आहे. तीसुद्धा त्यातून कोट्यवधी कमावते.

हा स्टार दुसरा-तिसरा कोणी नसून शाहरुख खान आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये स्क्वेअर मासिकाने जगातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत टॉप 10 श्रीमंत अभिनेत्यांची नावं होती. ज्यामध्ये बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानच्याही नावाचा समावेश होता. गेल्या अनेक दशकांपासून त्याचं नाव या यादीत येत आहे. स्क्वेअरने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखची एकूण संपत्ती 876.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 7500 कोटी रुपये इतकी आहे. तो जगातील चौथ्या क्रमाकांचा श्रीमंत अभिनेता आहे.

शाहरुख खानची पत्नी गौरी प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर असून ती इतरही व्यवसाय करते. गौरीकडेही कोट्यवधींची संपत्ती आहे. तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला आहे. यातून ती दरवर्षी भरपूर कमाई करते.

गौरी खान निर्मातीसुद्धा आहे. तिच्या मालकीचं आलिशान रेस्टॉरंट आहे. 2002 मध्ये गौरीने शाहरुखसोबत मिळून 'रेड चिलीज एंटरटेन्मेंट' या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. याशिवाय मुंबई, दिल्ली, अलिबाग, लंडन, दुबई आणि लॉस एंजेलिसमध्ये तिची कोट्यवधींची घरं आहेत.

गौरीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास, 'लाइफस्टाइल एशिया'ने दिलेल्या माहितीनुसार, ती 1600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीची मालकीण आहे. मुंबईत गौरीचं इंटेरिअरचं आलिशान शॉप आहे. त्याची किंमत सुमारे 150 कोटी असल्याचं म्हटलं जातं. गौरी आणि शाहरुख हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहेत.