
2016 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला 'याड' लावलं होतं. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी साकारलेल्या आर्ची आणि परश्या या भूमिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. 'सैराट'ला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

'सैराट'ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. आठ वर्षांपूर्वी रिंकू कशी दिसत होती, पडद्यामागे आकाशासोबतची मजामस्ती आणि घोड्यावर स्वार झालेली आर्ची.. अशी दृश्ये या फोटोंमध्ये पहायला मिळत आहेत.

'सैराटला आज आठ वर्षे पूर्ण झाली', असं कॅप्शन देत रिंकूने या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 'भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मास्टरपीस', असं एकाने म्हटलंय. तर अनेकांनी चित्रपटांमधील गाण्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं.

'सैराट'मधील भूमिकेसाठी रिंकूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 100 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.

रिंकू आणि आकाशची जोडी रातोरात देशभरात हिट ठरली होती. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. 'सैराट'मधील गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत.