
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे प्रयत्न सुरू असले तरी, बिबट्याचे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत.

अशा परिस्थितीत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील एका जिद्दी शेतकऱ्याने कोणावरही अवलंबून न राहता आपल्या बुद्धीच्या जोरावर बिबट्याला पळवून लावण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

सुधीर चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून एक स्वदेशी अलार्म तयार केला आहे. सुधीर चव्हाण यांची कुरळप परिसरातील मळ्यामध्ये वस्ती आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट जनावरांच्या गोठ्यापर्यंत येत असल्याने त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.

मात्र त्यांनी वनविभागाकडे तक्रार करण्यासोबतच स्वतः काहीतरी उपाययोजना करण्याचे ठरवले. त्यातूनच या ध्वनी यंत्राचा जन्म झाला. वन्यप्राणी, विशेषतः बिबट्या, हे मानवी हालचाल आणि आवाजाला घाबरतात. हाच धागा पकडून चव्हाण यांनी झाडाच्या फांद्यांवर बियरच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या सुतळीच्या साहाय्याने टांगल्या आहेत.

या बाटल्यांच्या आत त्यांनी नट-बोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले आहेत की, वाऱ्याची साधी झुळूक आली तरी त्यातून खुळखुळ असा मोठा आवाज येतो. काचेवर धातू आदळल्याने निर्माण होणारा हा ठराविक आवाज रात्रीच्या शांततेत खूप दूरपर्यंत जातो.

यामुळे बिबट्याला तिथे कोणीतरी असल्याची किंवा काहीतरी हालचाल सुरू असल्याची शंका येते आणि तो परिसराकडे फिरकत नाही. कोणत्याही महागड्या उपकरणाची किंवा विजेची गरज नसलेले हे यंत्र अत्यंत कमी खर्चात तयार झाले आहे.

टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले हे टिकाऊ सुरक्षा यंत्र सध्या कुरळपमधील इतर शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. शासकीय मदतीची वाट न पाहता संकटावर कशी मात करता येते, याचे उत्तम उदाहरण सुधीर चव्हाण यांनी घालून दिले आहे अशा भावना परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.