
श्रावण महिना सुरु झाला आहे. यंदाही कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यानिमित्ताने सांगलीकरांना कृष्णा नदीच्या दुथडी भरून वाहणाऱ्या पात्रात होड्यांच्या थरारक शर्यती पाहायला मिळाला. अनेकांनी याचा किनाऱ्यावर उभं राहून आनंदही लुटला.

केशवनाथ मंडळाने ही पारंपारिक होड्यांची शर्यत आयोजित केली होती. या पारंपरिक शर्यतींनी नदीकाठी प्रचंड उत्साह आणि जल्लोष निर्माण केला होता. याचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.

दरवर्षीप्रमाणेच, कृष्णा नदीला आलेला पूर आणि श्रावणाचे पवित्र वातावरण साधून या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. सांगली आणि आसपासच्या परिसरातील १५ हून अधिक अनुभवी होडी चालक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

प्रत्येक संघाने विजयासाठी अफाट चुरस दाखवत आपली ताकद आणि कौशल्य पणाला लावले. जसा ढोल-ताशांचा निनाद कृष्णा नदीच्या काठावर घुमू लागला, तसतसा उपस्थितांमधील उत्साह शिगेला पोहोचला.

नदीच्या दोन्ही काठांवर सांगलीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण शर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी उत्सुक होते. पाण्याच्या लाटांवर वेगाने धावणाऱ्या होड्या, त्यांची वल्हवण्याची कला आणि प्रत्येक संघाने दिलेला जोरदार प्रतिसाद यामुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती.

प्रेक्षकांचा कल्ला, टाळ्यांचा गजर आणि 'भारत माता की जय' चे नारे यामुळे कृष्णा नदीचे पात्र खऱ्या अर्थाने दुमदुमून गेले होते. ही शर्यत केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून, त्या सांगलीच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहेत.

यातून केवळ खेळाडूंचा उत्साह दिसून येत नाही, तर येथील नागरिकांमधील एकोपा आणि पारंपरिक खेळांबद्दलची आवडही प्रकट होते. केशवनाथ मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत यशस्वीरित्या या स्पर्धांचे आयोजन केले होते.

यामुळे सांगलीकरांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. येत्या काळातही ही परंपरा अशीच पुढे चालू राहील, अशी आशा सांगलीकरांनी व्यक्त केली.