
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून संजय मिश्रा ओळखले जातात. आजवर त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. आता नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया...

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' हे नाटक हिंदी रंगभूमीवर दिसणार आहे. या नाटकात अभिनेते संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

संजय मिश्रा यांनी या नाटकाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा...

भेटीविषयी बोलताना संजय मिश्रा म्हणाले, "राज ठाकरेंनी मला भेटायला बोलावले. तिथे माझ्यासोबत गप्पा मारायला बसतानाच त्यांनी सर्वांना सांगितले, आज संजय आलाय... आपण सर्व हिंदीत बोलूयात..."

पुढे ते म्हणाले, "मला एक गोष्ट खूप चांगली वाटतेय की, एकीकडे अशा प्रकारची चांगली गोष्ट होतेय आणि आपण सगळे एकत्र येऊन एक प्रयत्न करत असू की हिंदीत मराठी नाटक... यातही महत्त्वाचा वाटा अभिजीत पानसेंचा आहे... याचे श्रेय कोण घेणार?"

सध्या सोशल मीडियावर संजय मिश्रा यांच्या या मुलाखतीची चर्चा रंगली आहे. तसेच त्यांना रंगभूमीवर पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.