
गणपती बाप्पाचे आगमन होत असताना घरातील बच्चे कंपनी आणि तरुणांचा उत्सह वेगळाच असतो. सजावटीसाठी त्यांचा पुढाकार असतो. वेगवेगळ्या कल्पना वापरुन आपला देखावा अधिकाधिक चांगला करण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जातो.

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील विंझर गावच्या अमित मधुकर सागर या तरुणाने घरी गणपती बसवला आहे. त्यासाठी त्याने शिवराज्याभिषेकचा देखावा बनवला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी अमित गेल्या आठ महिन्यांपासून तयारी करत होता.

अमित सागर याने शिवराज्याभिषेकचा ऐतिहासिक देखावा साकारण्यासाठी प्रत्यक्षात राजचिन्हे, पोषाख, शस्त्रे असे वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक ऐवजांची प्रतिकृती साकारलीय आहे. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने प्रेरित झालेल्या या तरुणाच्या कलाकृतीची शिवप्रेमींना भुरळ पडली आहे.

अमित याने तयार केलेला देखावा पाहण्यासाठी विझंर येथीलच नाही तर परिसरातील नागरिक भेट देत आहे. अमित स्वत: शिवराज्याभिषेक सोहळ्याची माहिती त्यांना देतो. यावेळी त्याने तयार केलेल्या देखाव्याचे कौतूक अनेक जण करत आहेत.

आता दहा दिवस गणेशोत्सव असला तरी या माध्यमातून समाजिक प्रश्न मांडले जातात. ऐतिहासिक देखावा करुन आपल्या इतिहासाची उजळणी केली जाते. मुलांना या देखाव्याच्या माध्यमातून माहिती मिळते. यामुळे दहा दिवस भाविक असे देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात.