
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बालाघाटात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर आला आहे. या महापुराने रौद्र रूप धारण केले आहे.

चांदनी नदीला महापूर आल्याने मांडेगाव, कांदलगाव, देवगावसह जवळपास आठ गावातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच या परिसरातील अनेक लघु प्रकल्प हे भरले आहेत.

कळंब तालुक्यातील बांगरवाडी, बार्शी तालुक्यातील चारे वालव, काटेगाव आणि कळंबवाडी हे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. तसेच, बाभूळगाव हा बृहत लघु प्रकल्पही मागील महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरला आहे.

महापुराचे पाणी नदीपात्रातून बाहेर पडून आगळगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, देवगाव, धस पिंपळगाव आणि कांदलगाव या गावांमध्ये शिरले आहे. त्यामुळे शेतांमध्ये पाच ते सात फूट पाणी साचले आहे.

या पाण्याखाली सोयाबीन, उडीद, मका, कांदा आणि ऊस यांसारखी पिके पूर्णपणे बुडाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कांदलगावामध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे.

सोलापूरच्या अनेक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गावातील प्रसिद्ध नरसिंह मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.