Malshiras Accident : पिकअप खोल विहिरीत बुडालं अन्…8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, माळशीरस अपघातात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या विहिरीत पिकअप पडले आहे, ती विहीर पाण्याने भरलेली होती. पिकअप थेट विहिरीत गेल्याने नाका-तोंडात पाणी गेल्याने एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूरच्या माळशीरस येथे धक्कादायक घटना घडली आहे. माळशीरस येथे रस्त्याच्या लोकांनी भरलेले पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत पडले आहे. या अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या विहिरीत पिकअप पडले आहे, ती विहीर पाण्याने भरलेली होती. पिकअप थेट विहिरीत गेल्याने नाका-तोंडात पाणी गेल्याने एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे तेथील लोकप्रतिनीधींनी सांगितले आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की ही खूपच दुर्दैवी घटना आहे. मी यंत्रणेकडून सगळी माहिती घडली आहे. ही घटना खूप गंभीर आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. विहिरीला कठडे आहेत की नाही, याची माहिती मी घेत आहे. परंतु खूप अगोदरची ही विहीर आहे, अशी माहिती मला मिळाली आहे.

अपघातात मृत्यू झालेले सगळे 8 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात घडला आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लोकांनी युद्धपातळीवर बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार ही विहीर मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.