
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची चांगली कामगिरी सुरूच आहे. मंगळवारी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या विजयानंतर आरसीबीने पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी पात्रता मिळवली. आता 29 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध सामना होणार आहे.

पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू थेट अंतिम फेरी गाठणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना या सामन्यात आरसीबीकडून जोश हेझलवूड खेळणार हे निश्चित असल्याचं दिनेश कार्तिकने सांगितलं आहे.

लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला की, 'जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि पुढील सामन्यात मैदानात उतरण्यास सज्ज आहे.' पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात हेझलवूड आरसीबीमध्ये पुनरागमन करेल अशी घोषणा त्याने केली असं म्हणावं लागेल.

जोश हेझलवूडच्या गैरहजेरीत आरसीबीची गोलंदाजी कमकुवत होती. विशेषतः गेल्या दोन सामन्यांमध्ये, आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही. हेझलवूड आता प्लेऑफमध्ये खेळणार असल्याने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

जोश हेझलवूड हा यावर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. हेझलवूडने गेल्या 10 सामन्यांमध्ये 36.5 षटके टाकली आहेत आणि एकूण 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकूण 103 डॉट बॉल टाकूनही चमक दाखवली. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)