
टी20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी आयपीएल स्पर्धेची रणधुमाळी क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळाली. खरं तर टी20 वर्ल्डकप संघात निवडीसाठी खेळाडूंची चाचपणी करता आली. पण पाच खेळाडू चमकदार कामगिरी करूनही टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळत नाहीत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वात संघाने प्लेऑफमध्ये धडक मारली होती. त्याने खेळलेल्या 15 सामन्यात 438 धावा केल्या. टी20 लक्ष केंद्रीत करण्यासाठी फाफने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. मात्र त्याची दक्षिण आफ्रिका संघात निवड झालेली नाही.

आयपीएल 2024 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेत पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलने पर्पल कॅपचा मान मिळवला. हर्षलने 14 सामन्यात 24 गडी बाद केले. मात्र इतकी चांगली कामगिरी करूनही त्याचा संघात समावेश झालेला नाही.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचीही काहीशी अशीच व्यथा आहे. टीम इंडियाचं नेतृत्वही ऋतुराजने केलं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऋतुराजने 14 सामन्यात 583 धावा केल्या. यात एका शतकी खेळीचाही समावेश आहे. मात्र त्याचा टी20 वर्ल्डकप संघात समावेश नाही.

ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेजर मॅकगर्कने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांनाचं लक्ष वेधून घेतलं. त्याने 9 सामन्यांमध्ये 234 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या. या कामगिरीनंतरही मॅकगर्कला ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात स्थान देण्यात आले नाही. त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या सुनील नरेनने अष्टपैलू खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फलंदाजीत 488 धावा आणि गोलंदाजीत 17 बळी घेतले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नरेनने टी20 विश्वचषक खेळावा असा आग्रह धरला. पण त्याने टी20 विश्वचषक खेळण्यास नकार दिला.