
दक्षिण अफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या वेशीवर येऊ उभी राहिली आहे. भारतासमोर विजयासाठी 550 धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठणं काही सोपं काम नाही. असं असताना यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाला. (Photo- BCCI Twitter)

गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी केली होती. पण दुसऱ्या डावात फक्त 13 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात मार्को यानसेनच्या जाळ्यात यशस्वी जयस्वाल अडकला. आखुड टप्प्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या नादात विकेटकीपरच्या हाती झेल देत बाद झाला. (Photo- BCCI Twitter)

यशस्वी जयस्वाल डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा सामना करताना चुका करत असल्याचं अधोरेखित झालं आहे. कारण त्यांच्याविरुद्ध खेळताना यशस्वीला अडचण येत असल्याचं दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात यशस्वी सहा वेळा लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाजांसमोर बाद झाला आहे. (Photo- PTI)

मार्को यानसेनने यशस्वी जयस्वालला तीन वेळा बाद केलं आहे. यानसेनविरुद्ध जयस्वालची सरासरी फक्त 14 आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सहा डावांपैकी पाच डावांमध्ये अपयशी ठरला आहे. यापैकी दोन डावात शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

यशस्वी जयस्वाल दक्षिण आफ्रिका आणि डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध खेळताना चाचपडताना दिसत आहे. त्यामुळे त्याला लवकरच त्याचे तंत्र सुधारण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात त्याच्या समस्या आणखी वाढू शकतात. (Photo- PTI)