
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. भारताने सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना तर अवघ्या 4 धावांनी गमावला. स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर सामन्याचं पूर्ण चित्रच बदलून गेलं.

इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना 4 धावा कमी पडल्या. सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने खराब शॉट सिलेक्शनला जबाबदार धरलं. यावेळी तिने स्मृतीचं नाव घेतलं होतं. आता स्मृती मंधानानेही सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्याची कबुली दिली आहे. विकेट पडल्यानंतर सामना हातून गेल्याचं सांगितलं.

इंग्लंडने दिलेल्या 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडिया चांगल्या स्थितीत होती. पण शेवटी केलेल्या चुका महागात पडल्या. 88 धावांची खेळी करणाऱ्या मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत 125 धावांची आणि दीप्ती शर्मासोबत 67 धावांची भागीदारी केली. पण एक चुकीचा फटका संघाला मारक ठरला.

स्मृती मंधाना म्हणाली की, "मला वाटते की आम्ही आमचे शॉट सिलेक्शनमध्ये अधिक चांगले करू शकलो असतो. त्याची सुरुवात माझ्यापासून झाली होती, म्हणून मला वाटते की आमची शॉट सिलेक्शन चांगली असायला हवं होतं. आम्हाला प्रति ओव्हर फक्त सहा धावा हव्या होत्या. कदाचित आम्हाला खेळ पुढे नेला पाहिजे होता. मी याची जबाबदारी घेते कारण विकेट पडण्याची सुरुवात माझ्यापासून झाली."

स्मृती मंधाना सामन्याच्या 42व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. ती बाद झाली तरीही भारत सामना सहज जिंकू शकला असता. कारण दीप्ती शर्मा आणि रिचा घोष या दोघीही अनुभवी खेळाडू होत्या. 47 व्या षटकापर्यंत त्याही बाद झाल्या. शेवटी अमनजोत कौर आणि स्नेह राणा विजय मिळवून देऊ शकले नाहीत. (सर्व फोटो- बीसीसीआय वुमन्स ट्वीटरवरून)