
आशिया कप स्पर्धेच्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा याने संयमी खेळी केली. रोहित शर्मा याने 49 चेंडूत 56 धावा केल्या. यात 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.

सामन्याला सुरुवात झाली तेव्हा रोहित शर्मा चाचपडत खेळत होता. शाहीन आफ्रिदीने त्याला बाद करण्यासाठी पुरेपूर जाळं लावलं होतं. पण रोहित शर्मा याने पहिले पाच चेंडू निर्धाव घालवल्यानंतर सहाव्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीत उलथापालथ झाली आहे. रोहित शर्मा याने पॉल स्टारलिंग यााच विक्रम मोडून दुसरं स्थान गाठलं आहे.

पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मार्टिन गुप्टिल 17 षटकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा 15 षटकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पॉल स्टारलिंगच्या नावावर 14 षटकार आहेत.

इविन लुईस 12 षटकारांसह चौथ्या स्थानावर, 10 षटकारांसह डेव्हिड वॉर्नर पाचव्या, कॉलिन मुनरो आणि ड्वेन स्मिथच्या नावावर प्रत्येकी 10 षटकार आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तान विरुद्ध हा रोहित शर्मा याचा ओपनर म्हणून 300 वा सामना आहे. सचिन आणि सेहवागच्या यादीत सहभागी झाला आहे. सचिनने 346 सामन्यात, तर सेहवागने 321 सामन्यात भारतासाठी ओपनिंग केली आहे.