
आयसीसी स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची कामगिरी कायम निराशाजनक राहिली आहे. अनेकदा विजयाचा घास तोंडाशी आला असताना गमवावा लागला आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त कामगिरी केली. एडन मार्करमने शतक ठोकलं आणि एका विक्रमाची नोंद केली आहे.

लंडनमधील लॉर्ड्स येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एडन मार्करामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले. या शतकासह आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बनला.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने 1998 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 61 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हेनरिक क्लासेनने 52 धावा केल्या होत्या.

आयसीसीच्या अंतिम सामन्यात तिहेरी आकडी धावसंख्या नोंदवून एडेन मार्करामने आता इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा विक्रमही मार्करामच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 207 धावांवर सर्वबाद झाली. त्यामुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या डावात 282 धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर 2 गडी गमावून 213 धावा केल्या. (सर्व फोटो- आयसीसी/दक्षिण अफ्रिका ट्वीटर)