
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावणारा टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल चांगल्या फॉर्मात आहे. दुसऱ्या कसोटीत 49 वर्षांच्या जुन्या विक्रमावर त्याचा डोळा असून मोडीत काढण्याची दाट शक्यता आहे.

लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जयस्वालने शानदार शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात 101 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात फक्त 4 धावा काढून बाद झाला. आता एजबेस्टन कसोटी सामन्यात पुन्हा धावा काढण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यात बॅट तळपली तर मोठा विक्रम नावावर होईल.

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल 2000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 97 धावा दूर आहे. जर यशस्वीने दुसऱ्या कसोटी सामन्यात असं केलं तर भारताकडून जलदगतीने 2000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. यासह सुनील गावस्कर यांचा 49 वर्षांचा जुना विक्रमही मोडेल.

सुनील गावस्कर यांनी 1976 मध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली होती. 23 कसोटी सामन्यात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. अद्याप गेली 49 वर्षे त्यांचा हा विक्रम अबाधित होता. आता यशस्वी जयस्वाल या विक्रमाचा अगदी जवळ आला आहे.

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 25व्या कसोटीत 2000 धावा पूर्ण केल्यात. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत 20 कसोटीत 52.86 च्या सरासरीने 1903 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय ट्वीटर)