
'ओ स्त्री कल आना' हा श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री' या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग असला तरी ती 'स्त्री' आजच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचल्यानंतर 'स्त्री 2' हा चित्रपट आता ओटीटीवर स्ट्रीम होत आहे.

अमर कौशिक दिग्दर्शित हा हॉरर कॉमेडी चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचाही विक्रम 'स्त्री 2'ने मोडला होता.

या चित्रपटाने 620 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. थिएटरमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहू शकला नसाल किंवा पुन्हा एकदा तुम्हाला मोबाइलवर हा चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर ओटीटीवर तो आता स्ट्रीम होतोय.

'स्त्री 2' हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांच्या 'मॅडॉक फिल्म्स' आणि 'जिओ स्टुडिओज'ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

यामध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावसोबतच पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका आहेत. 'स्त्री' हा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. हासुद्धा ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.