
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या 'अनसीन अनदेखा'मध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे गार्डन एरियात बसून लग्नाविषयी गप्पा मारत असतात.

यावेळी अभिजीत आणि निक्की सूरजला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारतात. अभिजीत म्हणतो, "मी घराबाहेर पडल्यानंतर तुला फॉलो करणार. जेव्हा तू लग्न करशील तेव्हा आम्हाला बोलव."

त्यावर सूरज म्हणतो, "मी घराबाहेर गेल्यावर सगळ्यांच्या संपर्कात राहणार. मी माझ्या लग्नाला सगळ्यांना बोलवणार. मी साध्या पद्धतीनेच माझं लग्न करेन. फक्त देवीसमोर जोडीदाराच्या गळ्यात माळ घालेन." हे ऐकून निक्की म्हणते, "पण हळद ठेवायची. आम्ही तुला हळद लावू. आम्हाला हळदीचा कार्यक्रम हवाच."

यावर सूरज पुढे म्हणतो, "हो हळद, सुपारीचा खेळ असणारच. त्याशिवाय मज्जा नाही येणार. निक्की तू कधी लग्न करणार आहेस? तुझ वय पण झालंय."

लग्नाच्या प्रश्नावर निक्की उत्तर देते, "मी जेव्हा लग्न करणार तेव्हा तुला नक्की बोलवणार. वयाचा काही प्रश्न नाही येत. मला सध्या तरी माझ्या आई बाबांसोबत राहायचं आहे. मी लग्न केलं तरी आई बाबांना सोबत घेऊन जाणार. जिथे कुठे पण जाणार त्यांना घेऊन जाणार. मला मोठं कुटुंब आवडतं."