
तब्बल 33 तासांनंतर लालबागचा राजाचं विसर्जन करण्यात आलं. गुजराजवरून आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर राजाची मूर्ती चढविताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे विसर्जनसाठी चौपाटीवरच 13 ते 14 तास प्रतीक्षा करावी लागली.

यंदा लालबागचा राजाच्या रथावर अनंत अंबानीसुद्धा उपस्थित होते. गिरगावल चौपाटीपर्यंत ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्याच रथावर अनंत अंबानींसोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियासुद्धा होता.

शिखर हा अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे. अंबानी कुटुंबीयांच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्याला अनेकदा पाहिलं गेलं. सोशल मीडियावर त्याने लालबागचा राजासोबतचे फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

'लालबागचा राजा चा विजय असो! गणपती बाप्पा मोरया .. पुढच्या वर्षी लवकर या. हे स्वप्नांचं शहर विघ्नहर्त्याला नमन करतं,' असं लिहित त्याने विसर्जनाचे फोटो पोस्ट केले आहेत. शिखरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. शिखरचा छोटा भाऊ वीर पहाडियाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.