
'तारक मेहता..'मध्ये आत्माराम भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांडवडकर ही मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जातंय. युट्यूबवर मंदार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये हात जोडलेला त्यांचा फोटो असून त्यावर लिहिलंय की, 'ते निर्मात्यांची पोलखोल करत आहेत आणि त्यांनी शो सोडला आहे.'

हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अखेर मंदार यांनीच त्यावर मौन सोडलं आहे. मंदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये मंदार यांनी स्पष्ट केलंय की युट्यूबर व्हायरल होणारे फोटो हे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घेतले गेले आहेत. त्याचप्रमाणे त्यावर लिहिलेला सर्व मजकूर खोटा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

"मी तारक मेहता.. या मालिकेला 16 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह केला होता. त्यातूनच त्यांनी फोटो उचलले आहेत आणि माझा खोटा व्हिडीओ बनवला आहे. हाच व्हिडीओ त्यांनी युट्यूबवर पोस्ट केला आहे. मला माझ्या पत्नीकडून या व्हायरल व्हिडीओविषयी समजलं. पण हा व्हिडीओ फेक आहे", असं मंदार यांनी स्पष्ट केलंय.

"मी तारक मेहता.. ही मालिका सोडणारही नाही आणि त्याबद्दल मला कोणतीच पोलखोलही करायची नाही", असंही त्यांनी म्हटलंय. याआधी अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरदसुद्धा मालिका सोडल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.