
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाचा उपप्रमख तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह कसुरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केली आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या व्हिडीओत कसुरीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच धमकी दिली आहे. या व्हिडीओत कसुरीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. याआधी कसुरी 4 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दिसला होता. त्यानंतर आता त्याचा मोदी यांना धमकी देणारा व्हिडीओ समोर आला आहे.

मी फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना विनंती करतो की, 10 मे 2025 रोजी आपण भारताला ज्या पद्धतीने धडा शिकवला होता, त्याच पद्धतीने आता मोदी यांना पुन्हा एकदा धडा शिकवावा, असे सैफुल्लाह या व्हिडीओत बोलताना दिसतोय.

मे महिन्यातच भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाही तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ले केले होते. भारताने धुळ चारलेली असली तरी या युद्धात आमचीच सरशी झाली, असा दावा पाकिस्तानकडून केला जातो.

पाकिस्तानसोबत संबंध बिघडल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. याचाच संदर्भ देत सैफुल्लाहने भारताने पाकिस्तानचे पाणी जाणूनबुजून आडवून धरले आहे, असा दावाही केला. दरम्यान, आता सैफुल्लाहने थेट मोदी यांना धमकी दिल्यामुळे आता भारत नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.