
जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने अखेर भारतात पहिले पाऊल टाकले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीने आपली पहिली कार Model Y भारतात लॉन्च केली आहे. ही एक एसयूव्ही (SUV) आहे ज्याची सुरुवातीची किंमत 61 लाख रुपये आहे. ही किंमत तिच्या रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) मॉडेलची आहे.

याचे कारचे दुसरे व्हेरिएंट, लाँग-रेंज रिअर-व्हील ड्राइव्ह असून 69 लाख रुपयांना उपलब्ध आहे. या गाड्या परदेशातून आयात केल्यामुळे त्यांची किंमत जास्त आहे. टेस्लाने नुकतंच भारतातील पहिले शोरुम मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे उघडले आहे. आता लवकरच दिल्लीतही ते एक शोरूम सुरू करणार आहेत.

आजच्या काळात इलेक्ट्रिक गाड्यांचा बाजार वाढत आहे आणि त्यात अनेक कंपन्या उतरल्या आहेत. चिनी कंपनी BYD, कोरियाच्या KIA, जर्मनीच्या BMW आणि मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक कार सध्या भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. टेस्लासमोर सर्वात मोठे आव्हान तिची किंमत हे आहे. कारण सध्या ही कार पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे.

टेस्ला मॉडेल वाय ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. जी एकदा चार्ज केल्यावर 568 किमी धावते आणि 0 ते 100 किमी/तास वेग 4.8 सेकंदांत गाठते. यात मोठी 15.4 इंच टचस्क्रीन आणि 8 इंच मागील टचस्क्रीन, 5 सीट्स आणि भरपूर सामान ठेवण्याची जागा आहे. सुपरचार्जिंगमुळे ही गाडी 15 मिनिटांत 267 किमीसाठी चार्ज होते. तिची किंमत तब्बल 61 लाख रुपयांपासून सुरू होते.

टेस्लाची BYD या चीनी कंपनीशी थेट स्पर्धा असणार आहे. BYD सील ही कार 53 लाख रुपयांना उपलब्ध आहे. ही कार 580 किमीची रेंज देते आणि 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 3.8 सेकंदांत गाठते. कारण ती टेस्लापेक्षा वेगवान आहे. यात 15.6 इंच टचस्क्रीन आणि पॅनोरॅमिक सनरूफसारखे फीचर्स आहेत.

लक्झरी इलेक्ट्रिक कारमध्ये मर्सिडीज EQB चा समावेश होतो ज्याची किंमत 75 लाख रुपयांपासून सुरू होते. ही 423 किमीची रेंज देते आणि 0 ते 100 किमी/तास वेग 6.2 सेकंदांत गाठते. यात 10.25 इंच ड्युअल-स्क्रीन सेटअप आणि उत्कृष्ट इंटिरिअर आहे.

किआ EV6 देखील टेस्लाला टक्कर देते. तिची किंमत 61-66 लाख रुपये आहे. तिचे टॉप मॉडेल 708 किमीची रेंज देते, जे सर्वाधिक आहे. 0 ते 100 किमी/तास वेग 5.2 सेकंदांत गाठते. यात 12.3 इंच ड्युअल-स्क्रीन आणि व्हेईकल-टू-लोड चार्जिंगसारखे (Vehicle-to-Load Charging) फीचर्स आहेत.

भारतातील सामान्य लोकांसाठी लोकप्रिय असलेली कार म्हणजे टाटा नेक्सॉन EV. तिची किंमत 14.5 लाख रुपयांपासून सुरू होते. ही 465 किमीची रेंज देते. टेस्लाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. टेस्ला प्रीमियम ग्राहकांना लक्ष्य करते. तर टाटा नेक्सॉन EV सामान्य लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे.