
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादातून मित्रांनीच एकमेकावर चाकूने वार करत एकमेकांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही घटना कल्याण पश्चिमेकडील के के वाईन्स समोर घडली आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून महात्मा फुले पोलिसांनी दोघांनी दिलेला तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. धक्कादायक म्हणजे एसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.

कल्याण पश्चिम येथे केके वाईन शॉपच्या बाजूच्या गल्लीत शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास महेंद्र निचित याने त्याचा मित्र तेजस निखारगे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने महेंद्र याने त्याच्याकडील धारदार चाकूने वार करत तेजस याला गंभीर जखमी केले.

त्याला सोडविण्यासाठी मध्ये पडलेले मित्र मोहन नाडार आणि अभिनंदन खरातदेखील जखमी झाल्याची तक्रार तेजसच्या मित्राने महात्मा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तर याचवेळी महेंद्र याने आपल्या तक्रारीत आपण घरी जात असताना आपल्या ओळखीच्या तेजस निखरगे याने आपल्याकडे दारूसाठी पैसे मागितले पैसे देण्यास नकार दिल्याने तेजससह त्याच्या दोन मित्रांनी आपल्याला लाथा बुक्क्यांनी आणि विटांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे.

या तक्रारींवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान हे दोघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचेदेखील पोलिसांनी सांगितले.