Photo : अवकाळीचा तडाखा! मुसळधार पावसाने अर्धा महाराष्ट्र व्यापला, शेतमालाचे प्रचंड नुकसान
Maharashtra Rain Update : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. आज राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सातारा : सातारा शहरासह ग्रामीण भागात वाई,जावळी,खंडाळा तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यामुळे सातारा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. आंब्याच्या मोहरा बरोबर गव्हाच्या ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पैठण तालुक्यातील देवगाव भागात गारांचा पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेती पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

बीड : बीडच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु या पावसाने आंबा बागेसह भाजीपाला वर्गीय पिकांना देखील फटका बसला आहे.

बुलढाणा : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून चिखली, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तीनही तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. कांदा, डाळिंब आणि मका या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.