
अनेकदा घराबाहेर पडण्याच्या गडबडीत एकतर वॉलेट घरी विसरते अथवा एटीएम कार्ड घरी राहते. कधी कधी एटीएम सोबत नेले तर मग पिन आठवत नाही. त्यामुळे एटीएमवर जाऊन भ्रमनिरास होतो. पण आता तुम्हाला एटीएम कार्ड सोबत वागवण्याची गरज उरली नाही.

UPI Cardless Cash withdrawal, ICCW या सुविधेमुळे एटीएम कार्ड सोबत नसतानाही तुम्हाला एटीएम मशीनमधून थेट रोख रक्कम काढता येईल. त्यासाठी एटीएम कार्डचा वापर करण्याची गरज नसेल. अनेक बँकांच्या एटीएममध्ये हे खास फीचर आले आहे.

या सुविधेमुळे ग्राहकांना आता एटीएम केंद्रावर गेल्यावर Google Pay, Phonepe BHIM अथवा इतर कोणत्याही युपीआय ॲपच्या माध्यमातून एटीएममधून थेट रक्कम काढता येईल. ही अगदी सोपी, सुलभ आणि जलद पद्धत आहे. यासाठी कार्ड स्वाईप करण्याची गरज नाही.

या सुविधेसाठी एटीएम केंद्रावर गेल्यावर एटीएमच्या स्क्रीनवर UPI Cash Withdrawal हा पर्याय दिसले. त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 100 ते 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम टाकावी लागेल. त्यानंतर एटीएमवर एक QR कोड तयार होईल.

आता हा QR Code तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील युपीआय ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. तुम्ही हा कोड स्कॅन केल्यानंतर युपीआय ॲपमध्ये तुमचा UPI PIN टाकावा लागेल. त्यानंतर व्यवहार पूर्ण करा या पर्यायावर क्लिक करताच एटीएममधून लागलीच पैसे बाहेर येतील.

युपीआय प्लॅटफॉर्म आधारे एटीएममधून तुम्ही दिवसाकाठी 10 हजार रुपये काढू शकता. पण ही सुविधा सध्या ICCW सक्षम असलेल्या एटीएमवरच उपलब्ध आहे. लवकरच ती देशभरातील अनेक एटीएम केंद्रावर सुरू होईल.