
कलर्स मराठी वाहिनीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत आता अशोक मामा आपल्या सुनेची म्हणजेच भैरवीची पहिली मंगळागौर साजरा करण्याचा घाट घालणार आहेत. सध्या मालिकेत अनिश आणि भैरवीचं लग्न पार पडलं असून आता भैरवीची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात अशोक मामा साजरी करणार आहेत.

त्यानिमित्ताने या खास भागात ‘कलर्स मराठी’वरील भैरवीच्या सुहासिनी मैत्रिणी म्हणजेच इंदू, वल्लरी, प्रेरणा मंगळागौरसाठी उपस्थित राहणार आहेत. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत लवकरच प्रेरणाचं देखील लग्न होणार आहे. या मंगळागौरीचं एक खास आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर.

मालिकेत वर्षा उसगांवकर मंगळागौर सादर करणाऱ्या महिला ग्रुपच्या अध्यक्ष आहेत आणि मामांच्या मैत्रीण देखील. मंगळागौरच्या खास भागात भैरवीसह कलर्स मराठीवरील सुहासिनी पारंपरिक नऊवारी साडीत, गजरा, दाग - दागिन्यांमध्ये सजून सहभागी होताना दिसणार आहेत.

पारंपरिक खेळ, नृत्य आणि जल्लोषात भरलेला हा भाग प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या मंगळागौरमध्ये वर्षाताईंचा खास डान्स परफॉर्मन्स देखील असणार आहे. आता वर्षा ताईंच्या एण्ट्रीनं मालिकेच्या कथानकात एक खास वळण येणार हे निश्चित.

याविषयी वर्षा उसगांवकर म्हणाल्या, "खास वैशिष्ट्य म्हणजे मी आणि अशोक सराफ छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. आम्ही दोघांनी मोठा पडदा तर गाजवला आहेच आणि आता छोटा पडदा देखील गाजवायला सज्ज आहोत. मला असं वाटतं की मी आणि अशोक सराफ हे तब्बल १८ - २० वर्षांनी एकत्र काम करणार आहोत."

"अशोक सराफ एक महानट आहेत. कारण त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला नेहमीच काहीतरी नवीन सापडलं आहे. त्याच्यासोबत काम करताना मी स्वतःला सापडत गेले," असं त्या म्हणाल्या. मालिकेत या दोघांना पुन्हा एकत्र काम करताना बघायला मिळणं म्हणजे सुवर्णसंधी आहे.