
मनोरंजन क्षेत्रात एखाद्याचं कौतुक होईल की ट्रोलिंग होईल, हे सांगणं नेहमीच कठीण असतं. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल होतात. गेल्या काही काळापासून ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या चर्चा आणि मुलाखतींमुळे सोशल मीडियावर ते सातत्याने ट्रोल होताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी आता सचिन पिळगावकर यांनी स्वतः प्रथमच या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या चौथ्या पर्वाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर आणि गायिका वैशाली सामंत पुन्हा एकत्र येत आहेत. या शोच्या प्रमोशनच्या निमित्ताने दोघांनी रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. याच मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं.

सचिन पिळगावकर म्हणाले, "आजच्या काळात बोलताना शब्दांची काळजी घ्यावी लागते, विचार करून बोलावं लागतं. पण याचा अर्थ दुसऱ्याच्या इच्छेनुसार जगावं असा नाही. स्वतःचं आयुष्य सोडून जगायचं नाही. प्रत्येकाला वेगळं असण्याचा हक्क आहे. पण जर कोणी विचारलं तर उत्तर द्या. पटत नाही म्हणून सांगा. सिनेमाबद्दल 'हा सिनेमा आवडला नाही' किंवा 'तुमचं काम आवडलं नाही' असं म्हणण्याचा हक्क आहे. पण वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. आम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढकलत नाही. हे लोकांना समजत नाही तो आमचा विषय नाही. त्याकडे लक्ष दिलं तर आपलाच वेळ वाया जाईल."

सचिन पिळगावकर यांनी शाहरुख खान यांच्या एका जुनी प्रतिक्रियेचा उल्लेख केला. शाहरुखला जेव्हा ट्रोलिंगबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला होता की, "प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. काळजी तेव्हाच करावी जेव्हा ती संख्या कमी होईल." पुढे ते म्हणाले, "ज्या लोकांनी आयुष्यात काहीच काम केलं नाही, ते मला ट्रोल करून रात्री शांत झोपतात आणि समाधान मानतात की त्यांनी मोठं काम केलं. त्यांच्या झोपेचं कारण मी आहे, त्यामुळे मी आनंदी आहे."

सचिन पिळगावकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. ते म्हणाले, "ट्रोलर्स कदाचित यातून पैसे कमवत असतील. ठीक आहे, कमवू देत. मी ६५व्या वर्षापर्यंत पोहोचलोय (३१ डिसेंबरला पूर्ण होतं), करिअरच्या ६५व्या वर्षी जर मी इतका महत्त्वाचा वाटत असेन की लोक ट्रोल करतात, तर याहून जास्त काय हवं? आता सोशल मीडियावर मी खूप पॉप्युलर झालोय, त्यामुळे भरपूर जाहिराती (ऍड्स) मिळत आहेत. बदल स्वीकारला पाहिजे. नकारात्मकता बाजूला ठेवा, ती बदलता येत नाही. तू मजा कर, मीही मजा करतो."

ते पुढे म्हणाले, "ट्रोलिंग करणारी ही मुले खूप छान आहेत. मी त्यांना मनापासून आशीर्वाद देतो. त्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं, ते खूप मोठे व्हावेत. पण ते मोठे तेव्हाच होतील जेव्हा ते दुसऱ्याच्या नावाला जितकं महत्त्व देतात तितकं स्वतःच्या नावाला देतील आणि काहीतरी स्वतःचे करून दाखवतील. काही मुलांना वाटतं मी त्यांच्याच वयाचा आहे, त्यांना माहितीच नाही की मी ६३-६५ वर्षांचा आहे. एका अर्थाने हे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे!"