
अभिनेत्री ऐश्वर्या रायचं माहेर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रीमा राय ही ऐश्वर्याची वहिनी आहे. श्रीमाने ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रायशी लग्न केलंय. मात्र श्रीमा आणि ऐश्वर्या यांचं फारसं पटत नसल्याचं समोर आलं आहे.

नुकताच आदित्य आणि श्रीमाने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चनने तिला शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ पाठवला होता. यानंतर श्रीमा राय प्रकाशझोतात आली. नेटकऱ्यांनी तिच्या प्रोफाइलवर जाऊन विविध फोटो पाहिले.

श्रीमाच्या प्रोफाइलवर ऐश्वर्यासोबत एकच फोटो दिसून येतो. हा फोटो आदित्य आणि श्रीमाच्या लग्नातला आहे. त्याशिवाय तिच्या प्रोफाइलवर कधीच ऐश्वर्या आणि आराध्यासोबतचे फोटो दिसले नाहीत. यावरून नेटकऱ्यांनी तिला सवाल केला.

नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर श्रीमानेही सडेतोड उत्तर दिलं आहे. 'ऐश्वर्याच्या प्रोफाइलवर जाऊन पहा, तिचेच सर्व फोटो आहेत. त्यात मीसुद्धा कुठेच नाही,' अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावलं आहे. या उत्तरामुळेच श्रीमा आणि ऐश्वर्याचा वाद चर्चेत आला आहे.

श्रीमा ही फॅशन इन्फ्लुएन्सर असून इन्स्टाग्रामवर तिचे एक लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. आदित्य आणि श्रीमा यांना दोन मुलं आहेत. ऐश्वर्याच्या आईसोबतही श्रीमाने काही फोटो पोस्ट केले आहेत.