विमान उडताना आकाशात पांढऱ्या रेषा का उमटतात? जाणून घ्या त्यामागचं रंजक कारण
आकाशातून विमान गेल्यावर त्याच्या मागे एखादी पांढरी रेषा दिसते. ती नक्की काय असते, कशी बनते, असा प्रश्ना आपल्याला अनेकदा पडतो, चला जाणून घेऊया..

निळभोर, स्वच्छ आकाश आणि त्यातून जाणारी एखाद-दुसरी पांढरी रेषा, असं दृश्य आपल्यापैकी अनेकांनी कित्येकदा पाहिलं असेल. यापैकी काही रेषा अवघ्या काही सेकंदात नाहीशा होतात, तर काही रेषा आकाशात तासभर तशाच टिकून राहतात आणि हळूहळू पातळ ढगांसारख्या पसरत जातात. पण या पांढऱ्या रेषा नेमक्या कशामुळे तयार होतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या रेषा म्हणजे, विमानातून निघणारा धूर नव्हे तर कॉन्ट्रेल्स (Contrails) मुळे तयार झालेल्या रेषा असतात. त्यामागे विमानाचं इंजिन, तापमान, आर्द्रता, उंची आणि वाऱ्याची दिशा अशा अनेक घटकांचा याच्याशी संबंध असतो.

गरम इंजिन आणि अतिशय थंड हवा - विमानाचं इंजिन इंधन जाळतं आणि त्यातून गरम वायू तसेच वाफ बाहेर पडते. विमान मोठ्या उंचीवर उडत असल्यामुळे हा गरम वायू अचानक अतिशय थंड हवेत मिसळतो. मात्र तापमान झपाट्याने कमी झाल्यामुळे वाफेचे संघनन होते आणि बर्फाचे सूक्ष्म स्फटिक तयार होतात. हे असंख्य सूक्ष्म स्फटिक एकत्र दिसल्यावर आपल्या डोळ्यांना आकाशात पांढरी रेषा दिसते.

हवेतील आर्द्रता महत्त्वाची - कॉन्ट्रेल किती वेळ टिकेल हे केवळ तिथल्या तापमानावर अवलंबून नसतं; हवेतील आर्द्रताही तितकीच महत्त्वाची असते. विमान एखाद्या ठराविक उंचीवरून जात असतं, तिथली हवा खूप कोरडी असेल तर तयार झालेले बर्फाचे स्फटिक लवकर नाहीसे होऊ शकतात. पण तिथल्या वातावरणात जर जास्त आर्द्रता असेल तर ते कण अधिक काळ टिकतात आणि पसरत जाऊन मोठ्या, पातळ ढगासारखे दिसू शकतात.

उंचीवर कमी हवेचा दाब - विमान ज्या उंचीवर उडतं तिथे जमिनीच्या तुलनेत हवेचा दाब कमी असतो. इंजिनमधून बाहेर पडणारे गरम वायू या कमी दाबाच्या वातावरणात वेगाने पसरतात आणि थंड होतात. या प्रक्रियेमुळे वाफेचं बर्फाच्या स्फटिकांमध्ये रूपांतर होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

इंजिन आणि इंधनाचाही होतो परिणाम - पहायला गेलं तर सर्व विमानांच्या इंजिनामधून अगदी समान प्रमाणात वायू आणि सूक्ष्म कण बाहेर पडत नाहीत. इंजिनचा प्रकार, त्याची कार्यक्षमता आणि वापरलं जाणारे इंधन यामुळे उत्सर्जित होणाऱ्या वाफ आणि सूक्ष्म कणांचे प्रमाण बदलू शकते. हे सूक्ष्म कण बर्फाच्या स्फटिकांच्या निर्मितीसाठी आधार ठरू शकतात. त्यामुळे काही विमानांच्या मागे कॉन्ट्रेल अर्थात त्या पांढऱ्या रेषा अधिक स्पष्ट दिसतात, तर काहींच्या मागे ते कमी दिसू शकतात.

जेव्हा कॉन्ट्रेल तयार होतं, ते काही आकाशात एकाच जागी स्थिर राहत नाहीत. उंच वातावरणातील वारे त्यांना हळूहळू ओढतात आणि पसरवत नेतात. म्हणूनच सुरुवातीला आपल्याला एखादी रेषा अगदी सरळ दिसत असली तर ती काही वेळाने रुंद होऊ शकते. किंवा ती वाकूही शकते. वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील अशांततेनुसार तिचा आकार सतत बदलत राहतो.

विमान किती उंचीवर उडत आहे याचाही कॉन्ट्रेल तयार होण्यावर मोठा परिणाम होतो. कारण मोठ्या उंचीवर वातावरणाचं तापमान खूप कमी असतं, त्यामुळे इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या वाफेचं बर्फाच्या स्फटिकांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता वाढते. मात्र याउलट कमी उंचीवर हवा तुलनेने उबदार असल्यामुळे कॉन्ट्रेल्स तयार होण्याची शक्यता कमी असते.