
स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. बाजारात अनेक रंगांचे स्मार्टफोन उपलब्ध असले तरी जवळजवळ प्रत्येक कंपनीचे चार्जर आणि त्यांच्या केबल या पांढऱ्या रंगाच्या असतात.

स्मार्टफोनचे इतके रंग असतानाही चार्जर हा नेहमी पांढऱ्या रंगाचा का असतो, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. हा केवळ योगायोग नाही. तर यामागे अनेक गुपिते दडलेली आहेत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

पांढरा रंग स्वच्छ आणि प्रिमियम लूक देतो. त्यामुळे, चार्जरला एक प्रीमियम आणि आकर्षक लूक मिळतो. ॲपलसारख्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांसाठी पांढऱ्या रंगाचा वापर करून त्याला एक वेगळी ओळख दिली आहे. या ट्रेंडमुळे, इतर कंपन्यांनीही पांढरा रंग निवडायला सुरुवात केली. जेणेकरून त्यांचे चार्जरही आकर्षक दिसतील.

जेव्हा आपण फोन चार्जिंगसाठी लावतो, तेव्हा अनेकदा चार्जर गरम होतो. जर तुम्ही पांढऱ्या रंगाचा चार्जर वापरत असाल तर पांढरा रंग उष्णता लवकर शोषून घेत नाही. या उलट ती परावर्तित करतो. यामुळे चार्जर कमी गरम होतो. जास्त तापण्यापासून त्याचे संरक्षण होते. याउलट, काळे किंवा इतर गडद रंगाचे चार्जर उष्णता लवकर शोषून घेतात. ते जास्त गरम होऊ शकतात. ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

चार्जर बनवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक मूळ पांढऱ्या रंगाचे असते. त्यामुळे, कंपन्यांना पांढऱ्या रंगाचे चार्जर बनवण्यासाठी अतिरिक्त रंग किंवा प्रक्रिया करण्याची गरज लागत नाही. ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.

पांढऱ्या रंगावर घाण, ओरखडे किंवा जळल्याच्या खुणा लगेच दिसतात. त्यामुळे चार्जर खराब होत असेल किंवा त्यात काही समस्या येत असतील तर ते लगेचच समजते. हे एकप्रकारे सुरक्षिततेचे लक्षण आहे. याउलट, काळ्या किंवा गडद रंगाच्या चार्जरवर अशा खुणा लगेच दिसत नाहीत. ज्यामुळे धोका वेळीच लक्षात येत नाही.

पांढरा रंग शांतता, साधेपणा आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. अनेक कंपन्यांनी त्यांच्या ब्रँडच्या प्रतिमेचा भाग म्हणून पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे. ॲपलने पांढऱ्या चार्जर आणि केबल्सना त्यांच्या ब्रँडची ओळख बनवली आहे. ज्याचा परिणाम इतर कंपन्यांवरही दिसून येतो.

आता तुम्ही म्हणालं की काळ्या रंगाचे चार्जर वाईट असतात का? तर तसे अजिबात नाही. आता बहुतेक कंपन्या पांढऱ्या रंगाला प्राधान्य देत त्याच रंगाचे चार्जर बनवतात. त्यामुळे सध्या बाजारात पांढऱ्या रंगाचे चार्जर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.