
जगभरात असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याच्या कपाटात तुम्हाला टी-शर्ट सापडणार नाही. आरामदायी पण तितकाच स्टायलिश असलेला हा पोशाख आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, त्याला टी-शर्ट का म्हणतात? त्याला हे नाव का पडले? यामागे नक्की काय रहस्य आहे? आज आपण टी-शर्टचा खरा अर्थ आणि त्याला नाव कसं पडलं याबद्दल जाणून घेणार आहोत.

काही फॅशन तज्ज्ञांच्या मते, टी-शर्टचे नाव त्याच्या आकारावरुन पडल्याचे बोललं जातं. जेव्हा तुम्ही टीशर्ट जमिनीवर पसरवतात किंवा हँगरला टांगता, तेव्हा त्याचा आकार T या इंग्रजी अक्षराप्रमाणे दिसतो.

कॉलर नसलेला, सरळ, साधा असलेला टी-शर्ट दोन्हीही बाजूने पाहिल्यानंतर तो T अक्षराप्रमाणाचे दिसतो. त्यामुळेच त्याला टी-शर्ट म्हणत असावे, असा अंदाज काही फॅशन तज्ज्ञांकडून लावला जातो.

तर ब्रिटिश वृत्तपत्र 'द सन' च्या एका रिपोर्टनुसार टी-शर्टच्या नावामागे एक वेगळीच रंजक कहाणी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैनिकांना प्रशिक्षणादरम्यान हलके आणि आरामदायी कपडे दिले जात होते.

या कपड्यांना ट्रेनिंग शर्ट (Training Shirt) असे म्हटले जायचे. मात्र कालांतराने या ट्रेनिंग शर्टचा शॉर्ट फॉर्म म्हणून टी-शर्ट हे नाव रुढ झाले आणि आता जगभरात ते लोकप्रिय आहे.

हल्ली टी-शर्ट फक्त एक साधा कपडा राहिलेला नाही. तो प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि फॅशन सेन्सचे प्रतीक बनला आहे. कॉलेजमधील तरुणांपासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकजण टी-शर्ट परिधान करतो.

तसेच हल्ली प्रवासाला जाताना अनेकजण टी-शर्ट परिधान करण्याला प्राधान्य देतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी टी-शर्ट हा एक परफेक्ट पर्याय असतो. साध्या रंगांपासून आकर्षक डिझाइन्स, ग्राफिक्स, स्टायलिश लोगो आणि युनिक प्रिंट्सचे टी-शर्ट हल्ली बाजारात उपलब्ध आहेत.