
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासह भारतात परतली आहे. आता लवकरच ती कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणी म्हणून येणार असल्याचं कळतंय. सानियाने खुद्द यासंदर्भातील एक फोटो पोस्ट केला आहे.

सानिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिलाच फोटो हा कपिल शर्माच्या सेटवरील असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सानिया कपिलच्या शोमध्ये पाहुणी म्हणून गेली का, असा सवाल नेटकरी करत आहेत. कपिलचा शो आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शोएब मलिकच्या विवाहबाह्य संबंधांना वैतागून सानियाने त्याला 'खुला' दिल्याचं म्हटलं जात आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसऱ्यांदा निकाह केला आहे. कपिलच्या शोमध्ये सानिया तिच्या घटस्फोटाविषयी व्यक्त होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शोएबचा हा तिसरा तर सना जावेदचा हा दुसरा निकाह आहे. याआधी तिने गायक आणि अभिनेता उमैर जस्वालशी निकाह केला होता. सानिया मिर्झाची फसवणूक केल्याबद्दल भारत आणि पाकिस्तानातील असंख्य नेटकऱ्यांनी शोएबला ट्रोल केलं.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 मध्ये हैदराबादमध्ये मुस्लीम पद्धतीने निकाह केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये वलिमा पार पडला होता. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानियाने मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएबचा मुलगा इझहान आता पाच वर्षांचा आहे.