23 मे नंतर ममता दीदींचे 40 आमदार टीएमसी सोडतील, मोदींच्या दाव्याने खळबळ

23 मे नंतर ममता दीदींचे 40 आमदार टीएमसी सोडतील, मोदींच्या दाव्याने खळबळ

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केलाय. या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता दीदींचे 40 आमदार तृणमूल काँग्रेस सोडणार असल्याचा दावा मोदींनी बंगालमधील सेरमपूर येथील सभेत केला. टीएमसीचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. पश्चिम बंगालमधील राजकारणात मोदींच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीचे अनेक खासदार भाजपात आले होते.

पश्चिम बंगालच्या लोकांचा विश्वासघात करणाऱ्या दीदींनी फक्त एवढं लक्षात घ्यावं की लोक चूक माफ करु शकतात, पण विश्वासघात नाही. दीदी, तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल येईल आणि चौफेर कमळ फुललेलं असेल तेव्हा तुमचे आमदारही तुम्हाला सोडून जातील. आजही तुमचे 40 आमदार आमच्या संपर्कात आहेत. दीदी, तुमचं वाचणं कठीण आहे, कारण तुम्ही विश्वासघात केलाय, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केलाय.

दरम्यान, मोदींनी बंगालच्या मातीने आणि दगडांनी बनवलेला रसगुल्ले मोदींना पाठवणार असल्याचं ममता म्हणाल्या होत्या. यावरही मोदींनी टोला लगावला. ज्या मातीत रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला, ज्या मातीवर स्वामी विवेकानंद, महाप्रभू, जगदीशचंद्र बसू, नेताजी सुभाषचंद्र बोस, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या अनेक महापुरुषांचा जन्म ज्या मातीत झाला ते मातीचे रसगुल्ले माझ्यासाठी प्रसाद असतील, असं मोदी म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. टीएमसी कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदान केंद्रावर जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप मोदींनी केला. पश्चिम बंगाल हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. उत्तर प्रदेशात नुकसान झाल्यास ते या राज्यातून भरुन काढण्याचा भाजपचा मानस आहे. कारण, उत्तर प्रदेश (80) आणि महाराष्ट्रानंतर (48) सर्वाधिक जागा असणारं पश्चिम बंगाल (42) हे तिसरं राज्य आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी गेल्या पाच वर्षांपासून बंगालमध्ये विशेष लक्ष दिलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI