
आज महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. खरंतर या अधिवेशनात जनतेच्या नागरी मुद्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्यादिवशी विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार ही चर्चा आहे?. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट खूप आग्रही आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीचे एकूण आमदार 46 आहेत. त्यात सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे आहे. म्हणून ते विरोधी पक्षनेते पदाची मागणी करत आहेत.
आज विरोधी पक्षनेतेपदासाठी अचानक आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं. भास्कर जाधव यांच्याजागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्याची ठाकरे गटात चर्चा असल्याची बातमी आली. उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे असं बोललं जात होतं.
आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते पदाबद्दल काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंनी ते विरोधी पक्षनेते होणार असल्याची बातमी फेटाळून लावली. ‘ही बातमी पेरलेली आहे. अफवा आहेत या, यावर विश्वास ठेऊ नका’ असं ते म्हणाले. उलट आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘एका गटातून 22 आमदार जाणार असं मी ऐकलं आहे’
निलेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलं?
त्यावर कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. “ज्योतिषी आहेत का ते ? त्यांचे 20 च आमदार राहिले आहेत. नको त्या विषयांमध्ये त्यांनी बोलू नये” असं निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना सुनावलं.
विरोधी पक्षनेतेपद मिळण्यात पेच काय?
288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एकूण जागांच्या किमान 10% जागा (म्हणजे 29 आमदार) असणे आवश्यक आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. यात ठाकरे गट (शिवसेना) 20, काँग्रेस १६, शरद पवार गट (राष्ट्रवादी) 10 आमदार आहेत. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे 29 आमदार नाहीत, त्यामुळे हे पद रिक्त आहे.