पूरस्थितीवर चर्चेसाठी नाना दिल्लीत, अमित शाहांचीही भेट

| Updated on: Aug 19, 2019 | 9:46 PM

नाम फाउंडेशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्ली गाठली आहे. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची संसद भवनात भेट घेतली.

पूरस्थितीवर चर्चेसाठी नाना दिल्लीत, अमित शाहांचीही भेट
Follow us on

नवी दिल्ली : नाम फाउंडेशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्ली गाठली आहे. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची संसद भवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामधील पूरग्रस्त भागातील स्थितीवर चर्चा केली.

याआधी नाना पाटेकर यांनी बुधवारी (14 ऑगस्ट) कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे पूरग्रस्तांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शिरोळ भागातील पूरबाधित भागाची पाहणी केली. 100 टक्के जमीनदोस्त झालेली घरे आणि अंशत: पडझड झालेल्या घरासंदर्भात त्यांनी प्रशासनासोबत देखील चर्चा केली. तसेच नाम फाउंडेशन शिरोळ तालुक्यात 500 घरं बांधून देईल, असं आश्वासन दिलं.

नाना पाटेकर म्हणाले, “यामध्ये सरकारची रमाई योजना, इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री घरकूल योजना याच्या अटी शिथील करून द्याव्यात. तसेच या योजनेद्वारे घरकूलासाठी दिले जाणारे अनुदान, निधी सरकारने अदा करावा. उरलेले पैसे नाम संस्था खर्च करेल. त्यातून पीडित कुटुंबाला पक्के घर उभं राहिल.”

यासंदर्भात नाम फाउंडेशनच्यावतीने आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेणार असल्याचे सांगत सर्व विषय मार्गी लावणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. हेच माझे पुण्य आहे, असंही नाना पाटेकर म्हणाले.

यावेळी नाना पाटेकर, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार गजानन गुरव, जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाटगे, डीवायएसपी किशोर काळे हे देखील उपस्थिती होते.