माझा आवाज पहिल्यापासूनच टाइट, पण… ‘त्या’ वादावरून अब्दुल सत्तार स्पष्टच बोलले…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधीही आचारसंहिता लागेल, त्यामुळे ही सगळी टेंडर निघायला हवीत, असं मत मी मांडल्याचं सत्तार म्हणाले. तसेच ही भावना फक्त मीच नाही तर इतरही आमदार, खासदारांनी मांडली. डॉ. श्रीकांत शिंदेही तिथे होते, असं सत्तार म्हणाले.

माझा आवाज पहिल्यापासूनच टाइट, पण... त्या वादावरून अब्दुल सत्तार स्पष्टच बोलले...
Image Credit source: social media
| Updated on: Oct 10, 2022 | 12:58 PM

समीर भिसे, मुंबईः कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे मुख्यमंत्र्यांचे (CM Eknath Shinde) सचिव खतगावकर (Khatgaonkar) यांच्यावर का भडकले, खरंच त्यांनी शिवीगाळ केली का, याविषयी अब्दुल सत्तार यांनी टीव्ही9 कडे प्रतिक्रिया दिली. खरं तर बैठकीत असा वाद झालाच नाही. मी भडकलो वगैरे नव्हतो, पण माझा आवाज पहिल्यापासूनच टाइट आहे, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.

शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त सर्व आमदारांची बैठक काल वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी निधी देण्यावरून मी फक्त माझ्या भावना मांडल्या, असं वक्तव्य सत्तार यांनी केलं.

आम्ही जेव्हा सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा जुन्या सरकारनं काहीही मोठे निर्णय बेशुमार घेऊन टाकले. त्यातील काही शंका-कुशंका असतील तर ते बघूनच काम पाहिले जातील.
सरकारनं कामं केली G R काढले पण ती काम व्हायलाच पाहिजेत ना, असा आग्रह मी धरल्याचं सत्तार यांनी सांगितलं. पण मी शिवीगाळ केल्याच्या बातम्या पेरल्या गेल्याचं सत्तार म्हणाले.

अंधेरीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधीही आचारसंहिता लागेल, त्यामुळे हे सगळे टेंडर निघायला हवीत, असं मत मी मांडल्याचं सत्तार म्हणाले. तसेच ही भावना फक्त मीच नाही तर इतरही आमदार, खासदारांनी मांडली. डॉ. श्रीकांत शिंदेही तिथे होते, असं सत्तार म्हणाले.

ऐका काय घडलं? सत्तार यांच्याच तोंडून—

दरम्यान, निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाविषयी बोलण्यासाठी आम्हाला वेळच दिला नाही, अशी नाराजी शिवसेनेकडून व्यक्त केली जातेय. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, आयोगाने त्यांना अनेकदा पुरावे सादर करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे असं म्हमणं चुकीचं आहे.
त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. खोटे रबर स्टँप दाखवून त्यांनी बोगस कामं केली आहेत, असा आरोपही सत्तार यांनी केला.