…तर लोकसभेला मविआच्या 40 जागा निवडून येतील; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

| Updated on: Jun 08, 2023 | 8:21 AM

Balasaheb Thorat on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक, महाविकास आघाडी अन् जागावाटप; काँग्रेस नेत्याला विजयाचा विश्वास

...तर लोकसभेला मविआच्या 40 जागा निवडून येतील; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
Follow us on

अहमदनगर : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे. अशात राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विजयाबाबत विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अशातत महाविकास आघाडीकडूनही हा विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. माजी मंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही महाविकास आघाडीचाच विजय होईल, असं म्हटलं आहे.

ज्यांची जिथे क्षमता अधिक आहे. ते तिकीट त्या पक्षाला दिलं तर लोकसभेला मविआच्या 40 जागा निवडून येतील. शरद पवार म्हटल्याप्रमाणे आम्हाला तशी काळजी घ्यावी लागेल. जनता आमच्या पाठीशी असून सध्याच्या कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे विजय हा महाविकास आघाडीचाच होईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरही बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलंय. बाळासाहेब थोरात यांनी ही जागा लढवावी, असं बोललं जात आहे. त्यावर लोक आग्रह करताय पण मी तसा विचार केलेला नाही. आपलं घर चांगलं सांभाळाचं आणि बाहेर मदत करायची. दुसरीकडे नवे काही करण्याची मला सवय नाही. राजकारणात व्यक्तिगत वैर मी ठेवत नाही. मात्र पक्षाकडून एखादी जबाबदारी आली तर ती कार्यकर्त्यांना पाळावी लागते, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत.

बाळासाहेब थोरातांनी दक्षिणेतून लोकसभेची उमेदवारी केली तर लढत चांगली होईल, असं सुजय विखे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारताच बाळासाहेब थोरात खळखळून हसले.

राज्यघटनेनुसार सर्व धर्मांना समान अधिकार आणि संधी आहेत. सत्तेवर जाण्यासाठी धर्माच्या नावाने राजकारण केलं जातंय. कर्नाटक पराभवानंतर राज्यात धार्मिक तणावाच्या घटना वाढल्या आहेत. हा भाजपला त्यांच्या रणनीतीचा भाग वाटतो, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे.

समनापूर दगडफेकीवरही थोरातांनी भाष्य केलंय. संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरची व्यवस्था मोडून प्रगती रोखण्याचा प्रयत्न होतोय. देशात आणि राज्यातही जाणीवपूर्वक अशा घटना घडवल्या जात आहेत. मोर्चाच्या दिवशी सकाळी एक दुकान तोडलं गेलं. जातानाही एका समाजातील युवकांना, महिलांना आणि लहान मुलांना मारहाण झाली. कुणाच्यातरी सांगण्यावरून हे झालंय, असं ते म्हणाले.

पेटवता आलं तर पेटवा असं कुणीतरी सुचवतंय. अशा घटना देशासाठी दुर्दैवी आहेत. मोर्चेकऱ्यांनी आंदोलनादरम्यान संयम ठेवला, हे नाकारता येणार नाही. मात्र काही टोळ्यांनी मुद्दाम पेटवण्याचा प्रयत्न केला, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.