तर बाजार उठवणार…खुर्चीवरून अपमान केल्यानंतर सुनील तटकरेंचे मेहुणे बिरवटकरांचा रामदास कदमांना थेट इशारा
खेडमधील पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात खुर्चीवरून झालेल्या वादानंतर अजय बिरवटकर यांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'चिखलात आम्ही दगड मारत नाही' म्हणत त्यांनी नेमका रामदास कदमांना थेट इशाराच दिला आहे. नेमकं काय म्हणाले बिरवटकर?

खेडमधील पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात खुर्चीवरून सुनावणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांना जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘स्टेजवरची खुर्ची जरी रामदास कदम यांची असली, तरी पोयनार गाव माझं आहे. ती माझी जन्मभूमी आहे. तिथे मी त्या पद्धतीने उत्तर देऊ शकलो असतो, पण चिखलात आम्ही दगड मारत नाही,’ अशा शब्दांत बिरवटकर यांनी कदम यांच्यावर पलटवार केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील वादाला नवं वळण मिळालं आहे.
‘उतरत्या कळा लागल्या की आगपाखड सुरू होते’
रामदास कदम यांनी भर कार्यक्रमात खुर्चीवरून सुनावल्यानंतर अजय बिरवटकर यांनी फेसबुक पोस्ट करतही नाराजी व्यक्त केली. ‘उतरत्या कळा लागल्या की माणसाची अशीच आगपाखड सुरू होते,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली. आभाळ गाठण्याची जिद्द असली, तरी पाय जमिनीवर राहतील पण स्वाभिमानाला ठेच लागली, तर बाजार उठवला जाईल, असा इशाराही त्यांनी पोस्टमधून दिला.
दापोलीत विश्वासात न घेता कारभार सुरू असल्याचा आरोप
यावेळी बिरवटकर यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. राज्यात महायुती अभेद्य आहे. मात्र, दापोली विधानसभा मतदारसंघात जे काही चाललेलं आहे, ते विश्वासात न घेता चाललेलं आहे. तुमचं आहे काय, अशी त्यांची भूमिका आहे. भविष्यात आम्ही दाखवून देऊ, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कदम यांना इशारा दिला.
नेमका वाद काय झाला होता?
खेड तालुक्यातील 72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत 25 वर्षे अडकलेल्या पोयनार लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या भूमिपूजनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि रामदास कदम उपस्थित होते. तब्बल 25 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी 267 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या मुलाचं कौतुक करताना सुनील तटकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्याच कार्यक्रमात अजय बिरवटकर यांना खुर्चीवरून सुनावण्यात आलं. ‘बसायचं तर बस, नाहीतर जा,’ असे कदम म्हणाले होते.
दरम्यान, भूमिपूजनासाठी तटकरेंचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, जलपूजन त्यांच्या हस्ते करू, असं स्पष्टीकरण रामदास कदम यांनी दिलं होतं. मात्र, बिरवटकर यांच्या प्रत्युत्तरामुळे आता या राजकीय वादात आणखी भर पडली आहे.