सुरुवात त्यांनी केली, आम्ही काट्याने काटा काढू : अजित पवार

| Updated on: Sep 30, 2019 | 9:03 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे बारामतीतील आव्हान (Ajit Pawar on BJP Challenge) स्वीकारलं आहे.

सुरुवात त्यांनी केली, आम्ही काट्याने काटा काढू : अजित पवार
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान (Ajit Pawar on BJP Challenge) स्वीकारलं आहे. बारामतीतून विधानसभा निवडणूक (Baramati Assembly Election) लढण्यासाठी त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि गोपीचंद पडळकरांचं (Gopichand Padalkar) स्वागत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बारामतीतून ज्या कुणा उमेदवाराला तिकीट देतील त्यांना 1 लाख मताधिक्याने निवडून आणू, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

भाजपने लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील पवार कुटुंबाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याचं ठरवलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बारामती जिंकणार असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः बारामतीतून भाजपचे उमेदवार म्हणून धनगर नेते गोपीचंद पडळकरांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे यावेळी बारामती विधानसभा निवडणूक चांगलची चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे.

अजित पवार म्हणाले, “मतदार यादीत नाव आलं की भारतीय संविधानानुसार कुणालाही कोठूनही लढता येतं. त्यामुळे कुणीही बारामतीतून उभं राहिलं तरी हरकत नाही. ज्याला बारातमीतून लढायचं आहे त्याचं स्वागत. आम्ही प्रत्येकवेळी लढताना समोर तुल्यबळ उमेदवार आहे असं समजूनच लढत असतो. त्यामुळे बारामतीतून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्याला उमेदवारी देतील त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी लढू. बारामतीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणू.”

साताऱ्यातून लोकसभेसाठी कोण?

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवार कोण असणार यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “साताऱ्याच्या जागेबाबत निर्णय झाला आहे. 2 दिवसात याची घोषणा होईल. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा पोटनिवडणूक लढवणार नाही असं सांगितलं आहे. ते विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच लढेल.”

‘काट्याने काटा काढणार, सुरुवात त्यांनी केली आता तेच घडणार’

अजित पवार यांनी यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “काट्याने काटा काढायचा असतो. याची सुरुवात त्यांनी केली. आता तेच घडेल. यापुढे फोडाफोडी होईल. आघाडी विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागा जिंकेल.

‘राज ठाकरेंना फोन झाला, शुभेच्छा दिल्या आणि घेतल्या’

अजित पवार आणि राज ठाकरे याच्यातील संघर्ष काही नवा नाही. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आता या दोघांमधील कडवटपणा कमी झाल्याचंही पाहायला मिळत आहे. पवार म्हणाले, “राज ठाकरे यांना फोन झाला. ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मी त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी देखील मला शुभेच्छा दिल्या.”