मविआ उमेदवार संजोग वाघेरेंचा आतून प्रचार करणाऱ्यांना अजित पवारांचा सज्जड दम

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठंही दगाफटका करायचा नाही, असं म्हणत अजित पवार यांनी मविआ उमेदवार संजोग वाघेरेंचा आतून प्रचार करणाऱ्यांना सज्जड दम दिला.

मविआ उमेदवार संजोग वाघेरेंचा आतून प्रचार करणाऱ्यांना अजित पवारांचा सज्जड दम
अजित पवारांचा आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम
| Edited By: | Updated on: May 09, 2024 | 8:49 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा पार पडली. महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार यांची आज मावळ येथे सभा पार पडली. या निवडणुकीत अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या गटाच्या उमेदवारांमध्ये ही काँटे की टक्कर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

“मावळकरांनो निवडणूक महत्वाची आहे. नात्या-गोत्याचे आणि राजकारण याचा विचार करू नका. नातेवाईकांना म्हणावं या 13 तारखेला मतदान होणार आहे. 14 तारखेला या. जेवण घालतो, पोशाख करतो, हवं फार तर रुसू नये म्हणून अंगठी घालतो. या पद्धतीने सांगा आणि आता कोणाला घरी बोलावू नका”, असं अजित पवार यांनी आपल्या शैलीत आवाहन केलं.

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’

“खालची टीम जरा गडबड करत आहे, माझं लक्ष आहे. सुनील शेळके बोलला आहे. जर गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन. तेव्हा खालच्या कार्यकर्त्यांनी कोणती गडबड करू नये. आपला उमेदवार हे श्रीरंग बारणेचं आहेत. लक्षात ठेवा”, असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावलं.

‘मी मॅच फिक्सिंग करत नाही’

त्या दिवशी मी अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. त्यावेळी श्रीरंग बारणेंच्या विरोधी असणारे उमेदवार संजोग वाघेरे लक्ष देऊन उभे होते. मी स्टेजवर गेलो अन् गड्याने पाय धरले. फोटो काढला अन् दादांनी आशीर्वाद दिला, असा दावा केला. मी एकदा शब्द दिला की, कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी मॅच फिक्सिंग करत नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठंही दगाफटका करायचा नाही, असं म्हणत अजित पवार यांनी मविआ उमेदवार संजोग वाघेरेंचा आतून प्रचार करणाऱ्यांना सज्जड दम दिला. “राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येकाला सर्वांना सांगायचं आहे. आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे. राष्ट्रवादीच्या कोणी दगा-फटका केलेला मी सहन करणार नाही. सुनील शेळके जसं म्हणाला आणि बाळा भेगडेंना पडलेल्या मतांचा जो उल्लेख केला, याची बेरीज केल्यावर जे लीड दिसतंय तितकं लीड बारणेंना मिळायला हवं”, असं अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावलं.